वय !
*****
वय असते एक गणना
काळ चक्रातील आपल्या या
अस्तित्वाची मर्यादा सांगणारी
तशी ही गणना असते उपयोगी
जीवनाचे समायोजन करण्यासाठी
कारण तेवढेच असते आपल्या हाती
वय होते किंवा वाढत जाते
ही नैसर्गिक प्रक्रिया आहे .
शेवटी बालपण म्हणजे काय असते
तर पेशींची वाढ होणे
तारुण्य म्हणजे पेशींनी बहरून येणे
अन् वार्धक्य म्हणजे कार्य सरताच
स्वतः चे विलोपन करणे
तशी तर प्रत्येक जीवाची इच्छा असते
कायम अस्तित्व मान राहायची
अमरतेत वास करायची .
पण ते घडत नाही
वेळेच्या चाकाला बांधलेला देह
जातो फरफटत
वयाची गावे ओलांडत
घटन विघटनाचा हा खेळ
पाहिले की वाटते
कुणीतरी पेशींच्या या समूहाला
घट्ट जोडून ठेवू पाहतो
तर कुणी तरी त्यांना
विस्कळीत करू पाहतो
या न दिसणाऱ्या शक्तीत
मोडणारी विध्वंसक शक्ती
विजयी होताना दिसते
तिच्या यशाची पताका म्हणजे वय असते
नव सृजनाचा उ:शाप घेऊन
अन तो भोगून
संपून जातेय अस्तित्व
सरताच शक्ती स्वत:ला टिकवण्याची
अन् आपण म्हणतो त्याचे वय झाले होते
जसे माणसाचे वय होते
तसेच घरांचेही वय होते
झाडांचे पशुपक्ष्यांचेही वय होते
दिसणारी प्रत्येक गोष्ट विलय होते
एका अज्ञात अपरिहार्य शून्यात
ती विघटन करणारी शक्ती
ती रुद्र शक्ती ती शिवशक्ती
दिसते अविरत कार्यरत .
पण सहजच की बुद्धयाचच
हे कळायला मार्ग नसतो
म्हणून हाती आलेला
काळाचा हा तुकडा घेऊन
आपण जाणू इच्छितो हे रहस्य
काळाला जाणण्याचे व जिंकण्याचे
जे असते अवगुंठीत
कुण्या एका ज्ञानदेवांच्या शब्दात
कुण्या एका बुद्धाच्या संदेशात
कुण्या एका अवधुताच्या मौनात
जे पुसून टाकते
काळाची सीमा
गणनेची मर्यादा
अन् अस्तित्वाचा अंत होतो जाणिवेत
जाणीव जी असते देहातीत अन् वयातीत ...
अकाल !!
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे http://kavitesathikavita.blogspot.in