गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

तुज न ठाऊक


तुज न ठाऊक 
*********

असे माझ्या मनी 
क्वचित ते कुणी 
राहे रेंगाळूनी 
तुज सम  ॥

तुझे ते पाहणे 
चांदीचा पाझर 
चंद्र देहावर 
उतरणे ॥

तुझे ते बोलणे 
बासुरी गुंजन 
व्यापून जीवन 
माझे राही ॥

तुझे ते सांगणे 
मनाच्या आतून 
येतसे उमलून
फुल जैसे ॥

तुझे ते हसणे 
कलकल झऱ्याचे 
इवल्या बिंदूचे 
इंद्रधनु ॥

तुज न ठाऊक 
तुझिया नभात 
राहते उडत 
मन पाखरू ॥

किती तू जवळ 
अन किती दूर 
मीन की सागर 
जळी जैसा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

रंगले

रंगले
*******
जरी रंगले जीवन सारे 
परी काळीज नच रंगले 
भवताली फुलून वसंत
फूल अंतरी न उमलले ॥

काय कुणाची असेल चूक
कधी कुणाला नच कळते
कुंडीमधल्या मातीचे मग
सांभाळलेले त्राण सुटते ॥

असेल ओलही जीवनाची 
परी न पुरते जीवनाला 
अन लाखलाख योजनाही
उगाच जाती मग लयाला ॥

आता घेवून मांडीवरती
कुरवाळतो मी स्वप्न खुळे
तुकडेच ते अखेर सारे
जातात तसेच विखुरले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

या दत्ताने


या दत्ताने
********
या दत्ताने माझी पार वाट लावली 
पुरी वाट लावली ॥ धृ ॥

व्याधी लावली पोटी व्यथा घातली 
भयभीत करूनिया गाठ मारली ॥ या दत्ताने 

शांती लुटली माझी निद्रा चोरली 
जागताना त्याच्यासाठी ऊर्जा आटली ॥या दत्ताने 

मजा सरली माझी चैन संपली 
रंजनाची साधने ती सारी हरवली ॥ या दत्ताने 

बायको  रुसली अन् पोरे दूरावली
देवासाठी अंतरात आग लागली ॥ या दत्ताने 

दुनिया लूटली  सारी युद्धही हरली 
तहाची ती बात मागे नच उरली ॥या दत्ताने

करो हवे तो ते सारे  जीव घेवू दे रे
भाळी नावे त्याच्या मी चीरी लाविली ॥या दत्ताने

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .


रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३

शब्द पांघरावे


शब्द पांघरावे
*****

शब्द कशाला कुटावे 
अर्थ कशाला लावावे 
उराउरी का फुटावे 
नियमांच्या ॥१

भाव ओळीत आणावे 
मन मनात मुरावे 
आत काळीज हलावे 
वाचतांना ॥२

कधी व्यथा जीवनाच्या 
कधी कथा विजयाच्या 
कधी बाता गर्विष्टाच्या 
उमटाव्या ॥३

जेव्हा वाटते लिहावे 
तेव्हा सहज लिहावे 
अन शब्द पांघरावे 
निज येता ॥४

कवी म्हणा म्हणू नका 
मोठेपणा घेऊ नका 
परी भाव सोडू नका 
दाटलेला ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

स्मृती


स्मृती
*****
विझली चांदणी डोळीयात पाणी 
कशाला लिहिली देवा ही कहाणी ॥१
कैसा हा आटला प्राणदायी झरा 
श्वास हा कोरडा गळ्यात दाटला ॥२
आता कुणा सांगू गुज ते मनीचे 
विरुनिया जाती भाव या जीवीचे ॥३
ठाई ठाई भास स्मृती घरभर
कोरलेले येते नाव ओठावर ॥४
खांद्यावर साथ तुझिया प्रेमाची 
वाट पाहे कान अन् वाहवे ची ॥५
अजुनिया गाली तुझा मंद श्वास 
व्यापूनी तनुला तुझा प्रेम स्पर्श ॥६
सरले प्रेमळ मायेचे आभाळ 
उरले जगणे व्यर्थ होरपळ ॥७
अदृष्टाची दृष्ट लागली सुखाला 
तुझी स्मृती फक्त आता जगण्याला ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

स्व.लक्ष्मणराव गायकवाड (का कुणास ठावूक)

स्व.लक्ष्मणराव गायकवाड (का कुणास ठावूक)
*****************
माझ्या लहानपणीची अतिशय आवडती मावशी सती मावशी तिचा नवरा .
त्यांना देवाज्ञा झाली असे कळले .
अन जाणवले की 
अरे आपण गेली चाळीस वर्ष 
या माणसाला पाहिले नाही भेटलो नाही 
त्यांना नाही तर सती मावशीला ही
तिच्या मुलांनाही पाहिले आणि भेटलो नाही 
चाळीस वर्ष आपली मावस भाऊबहीण 
आपले कोणीच नाहीत
असे का झाले कुणास ठाऊक?

मी लक्ष्मणरावांना प्रथम पाहिले होते 
ते त्यांच्या लग्नातच घोड्यावर बसलेले 
डोक्याला बाशिंग बांधलेले 
मुंडावळ्या लवलेल्या रूपात
तो एकूणच रूबाबदार 
सरळ नाकाचा देखणा चेहरा असलेला 
लोभस माणूस होता 
तोंडात पान बहुदा कोरलेली मिशी 
एकदम तुळतुळीत दाढी 
कुठल्या राजपुत्र पेक्षा कमी दिसत नव्हता 
मला हा मावशीचा नवरा खूपच आवडला .
पण प्रत्यक्ष ओळख होणे बोलणे 
हे सर्व व्हायला किती जावे लागले 
पण खरी ओळख कधी झालीच नाही 
कारण कुणा न ठावूक ?

कुठे पुढे कळले 
ते त्यांना झालेले आजारपण 
त्यांच्यावर आजीने केलेला उपचारासाठी खर्च 
त्यांना मिळालेला पुनर्जन्म 
पुढे असेही कळले की 
ते मावशीला पाठवतच नाहीत माहेरी 
आम्हाला कुणालाच भेटायला  
का कुणास ठाऊक ?

मग मावशीही भेटायची खूप कमी होत गेली 
पुढे दूरवर लांबवर पुण्याच्या वेशीवर 
चंदन नगरला राहायला गेली 
तर मग हे काका कुठे भेटणार ?
पुढे काकानी टॅक्सी ड्रायव्हरचा पेशा स्वीकारला 
असे कळले ते पुणे मुंबई करायचे
आम्ही मुंबईला 35 वर्ष काढूनही 
क्वचितच ते आम्हाला भेटायला आले 
का कोणास ठाऊक?
.
पुढे आमची आई म्हणजे अक्का गेली 
तेव्हाही हे काका व सती मावशी 
कोणी सुद्धा भेटायला आले नाही 
किंवा कोणी सांत्वनाचे दोन शब्द पाठवले नाही पुढे आजीही गेली आजोबाही गेले 
नात्यातील मुख्य गाठीत सुटून गेल्या 

रस्ते वेगळे झाले होते 
राहुल राजश्री जयश्री गणेश यांचे 
लहानपणीची गोड चेहरे 
अजून आठवत आहेत मला 
ते जीवलग झाले असते पण तसे झाले नाहीत
का कोणास ठाऊक ?

झाडाच्या प्रत्येक फांदीचे 
एक वेगळे जग असते हेच खरे 
त्याची ती  पाने फुले फळे 
त्याच्या आधारावर  असतात
त्याच्या सत्तेतवर जगतात
आणि जर ती फांदी वेगळी पडली 
वेगळी झाली तर त्या फांदीवर 
फुललेली ती फळे फुले पाने 
ती ही वेगळी होतात दुरावतात .
तसेच काहीसे झाले होते 
लक्ष्मणराव गायकवाड अन् 
त्यांच्या कुटुंबीयांचे आमच्या सर्वांसोबत 
त्यांची  ती मुले कधी मोठी झाली 
त्यांची लग्न झाली त्यांची संसार फुलली
कळलेच नाही.
 
तशी मनात त्या मुलांची सती  मावशीची अस्पष्टशी स्मृती होती 
एक दोनदा भेटायचा प्रयत्न केला गेला 
पण तो सफल झाला नाही 
का कुणास ठाऊक 
काही नाती अशीच असतात 
जी  नियती कधीच जुळू देत नाही 
का कुणास ठाऊक?
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

माझी बहिण

माझी बहीण 
**********

लहानपणी मी तुला उल्लू बनवयचो 
आपला खाऊ भरकन खावून 
तुला लाडी गोडी लावायचो
अन् तुझ्या वाट्याच्या मिठाईवर
डल्ला मारायचो 
तेव्हा आपल्या हुषारीचा 
किती अभिमान वाटायचा मला
पण आता कळतेय 
तुला माझा आप्पलपोटी पणा 
माहित असूनही 
तो स्विकारून
तू द्यायचीय मला तुझा वाटा 
माझ्या हुशारीच्या अहंकाराला 
जरा ही न दुखवता 
किंबहुना त्याची दखल ही न घेता .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...