गुरुवार, २४ जानेवारी, २०१९

स्वप्नातल्या देवा



स्वप्नातल्या देवा
सत्यात येऊन
मजला घेऊन
जाशील का ?

पाहिले रुप जे
स्मृती प्रदेशात
प्रत्यक्ष डोळ्यात
दिसेल का ?

तव पादुकांचा
स्पर्श तो सुखाचा
भाग जागृतीचा
होईल का ?

जे भोगले तेथे मी
सुख सोहळ्यात
व्यर्थ जीवनात
उमटेल का ?

त्या गुढ डोंगरी
पुराण मंदिरी
कोरल्या राऊळी
भेटशील  का ?

अशी जाग आता
नको रे दयाळा
विक्रांत जिव्हाळा
होशील का ?


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


बुधवार, २३ जानेवारी, २०१९

दत्ताच्या शिवारी



दत्ताचा शिवारी
असे कुळवाडी
राखतो मी वृत्ती
तया कृपे 

कुंपण सावरी
गुरांना सांभाळी 
गोफन गरारी
घेई हाती ॥

सहा महाचोर
घुसता पिकात
नामाच्या धोड्यांत
घालू पाही ॥

त्रिकाळ राबतो
त्रिपुटी पाहतो
ॠतूंना जाणतो
आल्या गेल्या ॥

काम हे तयाचे
किती दिवसांचे
मज ना कश्याचे
मोजमाप ॥

तयाचे म्हणता
तयास स्मरता
सुख होय चित्ता
पुरे तेच ॥

कसतो विक्रांत
बसुनी देहात
दत्ताच्या शेतात 
आनंदाने
, © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २१ जानेवारी, २०१९

दत्त बुरुड




दत्त बुरुड
***********
जरठ कडक
वाढला हा वेत
वाकता वाकत
नाही जरी

कृपे भिजवावे
मग त्या तोडावे
हाती असू द्यावे
दयाघना

मग मी तगेन
जीवनी वागेन
तुझिया कृपेन
दत्तात्रेया 

देई त्या आकारी
राही व्यवहारी
करीन चाकरी
अहर्निश ॥

विक्रांत भिजला
अंतरी वाकला
बुरडे घेतला
दत्तरूपी


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http//kavitesathikavita.blogspot.in

दत्त स्मरा


दत्त स्मरा
***
करुणा कृपाळ
निर्गुण निर्मळ
भक्ताशी प्रेमळ
अवधूत ॥

ऐसा अवतार
नसे धरेवर
तया पदावर
लीन व्हावे ॥

ऐहिक देईल
सुखात ठेविल
प्रारब्धा ठाकेल
आड सदा ॥

मुक्ती तर त्यांनी
धरिली हातात
वाट ती पाहात
मागण्याची ॥

म्हणूनिया त्वरा
करा करा करा
श्री दत्तासी स्मरा
सदोदित ॥

विक्रांत जन्म हा
दत्ताला वाहिला
म्हणून जाहला
निश्चिंत रे ॥



©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http//kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २० जानेवारी, २०१९

म्हसोबा




किती तरी वर्ष  म्हसोबा 
उघड्यावरच बसलेला होता 
बाजेवर उघडबंब बसणाऱ्या 
सोनबा आजोबांसारखा 

रस्त्याच्या टोकाला 
त्यांच्या तिठ्यावरती 
जणू तिथून तो सगळ्या  
गल्लीवर नजर ठेवत होता  

दरवर्षी भेटायचो  मी त्याला 
मे महिन्यात सुट्टीत 
आजोळचा माझ्या तो 
एक अविभाज्य भाग होता 

रणरणत्या उन्हात 
तापून निघायचा 
धुवांधार पावसात 
चिंब भिजायचा 
नेहमीच तरतरीत 
अन् तेज तर्रार दिसायचा 

नाही म्हटलं तरी 
त्याची थोडी भीती वाटायची 
लाल शेंदरी रंग फासलेला 
नाक डोळे नसलेला 
भला थोरला देव होता तो 

कधी कधी दिसायचे 
त्याच्याभोवती लिंबू कापलेले 
कुंकवात भरलेले 
कधी ताजे पिवळे जर्द 
अख्खे बाजारातून आणलेले 
 पण कुणीही त्याला 
हात लावायचा नाही 

तर कधी असे नैवेद्य 
गव्हाची दामटी  
वर भातवरण असलेली 
संध्याकाळी दिवा अन् 
दिसे उदबत्ती पेटलेली 

रात्रीच्या अंधारात 
कधी कसाई वाड्याच्या 
रस्त्यावरून यावे लागले की
दुरूनच म्हसोबा दिसायचा 
किती धीर वाटायचा
जणू म्हणायचा 
"जा रे बिनधास्त मी आहे"! 

म्हसोबाच्या गोष्टी 
पराक्रम पुराणकथा 
कधीच कुणी सांगितल्या नाही
पण तरीही म्हसोबाला
 नमस्कार माझा कधी चुकला नाही 

अलीकडेच खूप वर्षांनी गेलो होतो 
आजोळच्या त्या जुनाट गल्लीत 
खूप काही बदलले होते 
आजी आजोबा दोन्ही मामा 
काळाच्याआड गेले होते 
डौलात उभी असलेली 
समोरील बिल्डिंग
आणि ते मोठे वाडे 
धुळीत मिळू पाहत होते 

जाता जाता कोपऱ्यावर 
पुन्हा म्हसोबा मला भेटला 
कुणीतरी म्हसोबावर 
छप्पर बांधले होते 
अचानक म्हसोबा मला 
खूप केविलवाणा वाटू लागला 
त्याचे ते आकाशाचे छत
जणू काही  हिरावून घेतले होते 
त्यांची ती उन्हाची वस्त्र प्रावरण 
अंगावरची कुणी काढून घेतली होती 
आकाशा एवढा म्हसोबा 
अचानक दोन फूट झाला होता 

क्षणभर थबकलो 
उगाच उभा राहिलो 
ओळखीच्या त्या शिळेमधून 
मला एक  परिचित स्मित जाणवले 
जुने आपले कुणीतरी भेटले असे वाटले 
त्या त्याच्या ओळखीने 
मग मीही मस्तक खाली झुकवले 

त्याक्षणी तिथे 
आजीने आजारपणात केलेले 
अन फेडलेले अनेक नवस 
तिच्या आशीर्वादा सकट 
माझ्या डोक्यावरून 
हात फिरवून गेले 
जणू माझे आजोळ 
त्या म्हसोबा मधून  
माझ्यासमोर प्रगट झाले  
ते क्षण बालपणाचे  
तिथेच कुणीतरी  
होते कोरून ठेवले

अन म्हसोबा असे पर्यंत
ते तिथेच राहणार होते 



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १९ जानेवारी, २०१९

साथी



साथी ।
.....   .. . 

दत्त माझा साथी
जीवाचा सोबती
बसवितो घडी
जीवनाची ।।

दत्त दावी मार्ग
हरता उपाय
सारुनी अपाय
आड आले ।।

दत्त आधी व्याधी
पेलून धरता
प्रारब्धी चालता
महावैद्य  ।।

दत्त आवरून
मोह भोवऱ्यात
आणून सोडत
सुखरूप ।।

दत्त महाराज
सुखाचे आभाळ
प्रेमाचा सुकाळ
सर्व काळ ।।

काय सांगू किती
गाऊ त्यांची कीर्ती
आसवांच्या लोटी
विक्रांत हा  ।।


 © डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

भेटली मजला अशी






भेटली मजला अशी
*****************
भेटली मजला अशी
धुंद गंध होऊन तू 
सारेच आकाश माझे
गेलीस भारावून तू
मागणी नव्हते कधी
माझे फुलल्या ऋतुला
नव्हतेच हाती घेणे
कधी वा इंद्रधनूला
पण ते सारे मज का
आता हवेसे वाटते
तुझ्या आतूर डोळ्यात
का विश्व सारे सजते
लोक म्हणती कशास
प्रेम मज ते कळले
स्पर्श चांदण्यांचे माझ्या
गात्रात या उतरले
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...