रविवार, २३ डिसेंबर, २०१८

स्वप्नभंग


स्वप्नभंग
********** *

वाट तुझी अडलेली
दार अन बंद आहे
धाव घेणे माझे व्यर्थ
एक मूर्ख छंद आहे

देणे तुझे खरकटे
आंबला त्या गंध आहे
कसे म्हणू किती वेळ
जगणे हे धुंद आहे  

जानतो अवमान हा  
उरामध्ये खंत आहे
उतरणे खालती नि
अस्तित्वास डंख आहे

होतो तरी श्वान पुन्हा  
पावुले ओढत आहे
फेकलेले कण तुझे
मानतो आनंद आहे

लोभ हा कसला अन
कसले हे बंध आहे
माये तुझे खेळणे वा
मारणे उदंड आहे

मिट माझे डोळे अन
बुडवून तुझ्यात घे
फेक दूर असे किंवा
होणे शतखंड आहे 

अर्धवट जागेपणी
जगणे दुभंग आहे
विसरणे माझे मला
माझा स्वप्नभंग आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

दत्तास्तव


दत्तास्तव 
********

दत्तास्तव मी
जगतो रे
ह्रदयी खडावा
धरतो रे 
अलख अंतरी ।।
गातो रे 
कळी काळा न 
भितो रे  ।।
दत्ता मजला
तुझा करी  
तुझेच प्रेम 
उरी भरी ।।
जीवन मरण 
माझे वारी
मधली माया 
दूर निवारी ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

दत्ताचिये वाटे


दत्ताचिया वाटे जाता
मन हरवून जाते
भक्ती सुखात रमते
पुन्हा माघारी न येते ।।

दत्ताचिया प्रेमामध्ये
देहभान विसरते
घरदार संसार वा
नच आपुले उरते ॥२॥

दत्ता तुझ्या वाटेवरी
मला सदा राहू दे रे.
दत्ता तुझे गीत नित्य
माझ्या ओठी येवू दे रे ।।

दत्ता तुझे रूप सदा
डोळा भर पाहू दे रे .
दत्ता तुझा भक्त खुळा
असा मला होवू दे रे ॥॥

दत्ताचिया वाटेवरी
विक्रांत बहु रमला
स्वप्न सत्य सुषुप्तीत
दत्त रूपासी जडला।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

घरदार


घरदार
******
ज्याचे त्याला असे
घरदार प्रिय
जपती स्वकीय
आप्त काम ॥

निवाऱ्याची साथ
निवाऱ्यास पिल्ले
निवारा भरले
घरकुल ॥

कुणा जागा वर
कुणास ती खाली
घरटी टांगली
जागोजाग ॥

सहस्त्र घरटी
एका झाडावर
वृक्ष धरेवर
कोटी कोटी ॥

विक्रांत ढोलीत
कुठल्या बसला
स्वर्गात रमला
मनाचिया ॥

खेळ मांडियेला
अनिकेता खुळा
आरंभ अंताला
पार नाही॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

या शहरात


या शहरात
********

येताच या शहरात
जळतात श्वास आत
मरणगंध घेवूनी
रोज जागते पहाट

वाहतात प्रेत सारी
संवेदना बोथटली
जीवनाच्या लत्करांनी
 इंच इंच व्यापलेली

एक फक्त पोट इथे
जीवनाचा सूत्रधार
अस्तित्वाच्या संगरात
कत्तलींचा रोज वार

रोज थवे जल्लादांचे
फिरती  बेभान इथे
पापण्या कापून निजे
रोज रोज स्वप्न इथे

 राहतो इथे कशाला
विक्रांता का लाज नाही
हरवले काय तू  ते
तुला तो अंदाज नाही

डॉ.विक्रांत प्राभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

पापाच्या गावाला


पापाच्या गावाला
*************

पापाच्या गावाला
पुण्याचा हा रस्ता
जाई का रे दत्ता
सांग मला ॥

उदर भरण
जरी साधारण
लुटीचे धोरण
का रे तिथे ॥

तुझिया नावाचा
होतोय व्यापार
हक्क नावावर
कुणाचा रे ॥

भरे मंत्रचळ
किती खुळे जन
ज्ञानाचे अंजन
नसे का रे ॥

धावती आंधळे
कळप मेंढ्यांचे
लोचट हाताचे
प्रसादाला ॥

पायाखाली कोण
जाती तुडवले
श्वास अडकले
कुणाचे ते ॥

तया ना फिकीर
तमा ती कशाची
व्यर्थ त्या कृपेची
हाव फक्त ॥

विक्रांत थकला
देवा  बाजाराला
परत चालला
खिन्नपणे॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८

किर्र रानी



किर्र रानी
****:
किर्र काळ्या राती होते
कुणीतरी भटकत
रानातल्या काजव्यांना
क्षणभर साथ देत॥

थबकून तरुखाली
होते रान सजवत
हरवून देहभान
स्वतःतच प्रकाशात .॥

रुजुनिया खोलवर
गेले वेडे झाड होत
किर्र गुंजारव स्वर
देहामध्ये कोंदाटत ॥

गंध हवेतला धुंद
होता युगे साठवत
अस्तित्वाला हरवून
कणकण उजळत ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspo

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...