शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

। मी ।



। मी ।


मी कोण आहे ?
या आदिम प्रश्नांची
कधीतरी उमटणारी
ठसठस
सहज विसरून जाते
जगण्याच्या धावपळीत
अहंच्या सजावटीत
सुख उपभोगाच्या तंद्रीत

जोवर समोर येत नाही
अस्तित्वाला नष्ट करणारे
देहाला मिटवणारे
मृत्यूचे दर्शन

मी जर मरणारच नसतो
तर काहीच प्रश्न नव्हता
मी कसा झालो
हे विचारण्याचा

ही संपून जाण्याची भीती
नसल्याची चिंता
कमवलेले हरवण्याची काळजी
कणाकणात रुतलेली आसक्ती
जी भाग पाडते
कळत न कळत
तोच प्रश्न विचारण्याला
मी कोण आहे
अन् हे सारे का आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

मार्दव (ज्ञानदेवीतील दैवी गुण)




मार्दव (ज्ञानदेवीतील दैवी गुण)
*****

मार्दव म्हणजे काय असते 
मनाचे कोवळे नाव असते 
नभातील ढगाप्रमाणे 
शीतळ प्रेमळ होणे असते

डोळ्याला स्पर्शणारी 
वायूची लहर असते 
मंद लहरीत चमचमता 
प्रेमाचा सागर असते 

अंकुरणाऱ्या बीजास जी
वाट मातीतून करून देते 
उठणाऱ्या शिशूच्या ते
डोळ्यातील मी पण असते 

रुपणे खुपणे काय ते
तेही तया ठाऊक नसते 
हवे हवेसे जगताला 
सदा सर्वदा प्रिय असते 

असे मन मवाळ केवळ 
देवाचेच देणे असते 
प्रभू पदाच्या स्वागताला 
उघडलेले द्वार असते 

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

चेतना व मुक्ती



 चेतना व मुक्ती
*********

मनाच्या दरवाजात
खिळलेली चेतना
उभी आहे अवघडून
महा शून्याचे आकाश
खुणावत आहे जिला
मंत्रमुग्ध करून
उचलायचे एक पाऊल फक्त
अन जायचे आहे
उंबरठा ओलांडून

पण किती जन्म
गेले आहेत उलटून
आणि किती निश्चय
गेले आहेत वाहून

जीवनाच्या भिंती
तशाच आहेत युगोनयुगे
अडकवल्या वाचून
तरीही मी अडकून
सुखदुःखाचा दमटपणा
आणि इच्छा आकांक्षांचा
अंधार घेऊन

खरं तर मी आकाश आहे
भिंती असून वा नसून
आतून अन बाहेरून
या जाणिवेची सुक्ष्म ज्योत
फडफडते
मनात खोल कुठून

पण पेशीच्या केंद्र बिंदूपाशी
जनुकांच्या साखळीत
रुतून बसलेली देहाची आसक्ती
सुरक्षितेचा हव्यास
बहुधा देत नाही पावले उचलून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
htttp://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

सर्वव्यापी दत्त।।



सर्वव्यापी दत्त।।
 **************
जल लहरींतून
दत्त वाहतो
पानो पानी
दत्त डोलतो 

युगोयुगी या
पाषाणातून
दत्त कृपेचा
स्पर्श करतो

पवनाच्या या
झुळुका मधूनी
दत्त जीवनी
प्राण भरतो

आकाश अवनी
अवघी व्यापुनी
मजला गिळूनी
दत्त राहतो 

दत्त माझा
मी दत्ताचा
या शब्दांनाही
अर्थ नुरतो 

दत्त दत्त मी
आहे असतो
पाहता पाहता
फक्त उरतो 

शब्दा वाचून
शब्दा मधून
एक दत्त तो
ध्वनी उमटतो 

अन विक्रांत
नाव जयाचे
तो कवितेचे  
शब्दच होतो


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...