शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

मार्दव (ज्ञानदेवीतील दैवी गुण)




मार्दव (ज्ञानदेवीतील दैवी गुण)
*****

मार्दव म्हणजे काय असते 
मनाचे कोवळे नाव असते 
नभातील ढगाप्रमाणे 
शीतळ प्रेमळ होणे असते

डोळ्याला स्पर्शणारी 
वायूची लहर असते 
मंद लहरीत चमचमता 
प्रेमाचा सागर असते 

अंकुरणाऱ्या बीजास जी
वाट मातीतून करून देते 
उठणाऱ्या शिशूच्या ते
डोळ्यातील मी पण असते 

रुपणे खुपणे काय ते
तेही तया ठाऊक नसते 
हवे हवेसे जगताला 
सदा सर्वदा प्रिय असते 

असे मन मवाळ केवळ 
देवाचेच देणे असते 
प्रभू पदाच्या स्वागताला 
उघडलेले द्वार असते 

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

चेतना व मुक्ती



 चेतना व मुक्ती
*********

मनाच्या दरवाजात
खिळलेली चेतना
उभी आहे अवघडून
महा शून्याचे आकाश
खुणावत आहे जिला
मंत्रमुग्ध करून
उचलायचे एक पाऊल फक्त
अन जायचे आहे
उंबरठा ओलांडून

पण किती जन्म
गेले आहेत उलटून
आणि किती निश्चय
गेले आहेत वाहून

जीवनाच्या भिंती
तशाच आहेत युगोनयुगे
अडकवल्या वाचून
तरीही मी अडकून
सुखदुःखाचा दमटपणा
आणि इच्छा आकांक्षांचा
अंधार घेऊन

खरं तर मी आकाश आहे
भिंती असून वा नसून
आतून अन बाहेरून
या जाणिवेची सुक्ष्म ज्योत
फडफडते
मनात खोल कुठून

पण पेशीच्या केंद्र बिंदूपाशी
जनुकांच्या साखळीत
रुतून बसलेली देहाची आसक्ती
सुरक्षितेचा हव्यास
बहुधा देत नाही पावले उचलून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
htttp://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

सर्वव्यापी दत्त।।



सर्वव्यापी दत्त।।
 **************
जल लहरींतून
दत्त वाहतो
पानो पानी
दत्त डोलतो 

युगोयुगी या
पाषाणातून
दत्त कृपेचा
स्पर्श करतो

पवनाच्या या
झुळुका मधूनी
दत्त जीवनी
प्राण भरतो

आकाश अवनी
अवघी व्यापुनी
मजला गिळूनी
दत्त राहतो 

दत्त माझा
मी दत्ताचा
या शब्दांनाही
अर्थ नुरतो 

दत्त दत्त मी
आहे असतो
पाहता पाहता
फक्त उरतो 

शब्दा वाचून
शब्दा मधून
एक दत्त तो
ध्वनी उमटतो 

अन विक्रांत
नाव जयाचे
तो कवितेचे  
शब्दच होतो


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शाळा (बालगीत)



शाळा

रेखीव आखीव
असे माझी शाळा
नीटस नेटका
प्रत्येक फळा ||

शाळेतील माझ्या
गुरुजन ज्ञानी
रमतो आम्ही
विद्येच्या अंगणी ||

देतात आम्हास
सुंदर संस्कार
भावी जीवनास
उद्याच्या आधार ||

सांगतात मंत्र
यशाचे पक्के
घडवती तंत्र
उतुंग नेमके  ||

शाळेविना न मी
कुणीच काही
शाळाच माझी
दुसरी आई ||

धन्य जाहलो
तुजला भेटलो
शाळा अशी ही 
भाग्ये लाभलो ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

सरता सरता ऋतू


सरता सरता ऋतू ।


सरता सरता ॠतु  वृक्ष कधी बहरून येतो
तीच जुनी अभिलाषा पुन्हा उरि घेऊन येतो

पान पान नवे हिरवे कच्च असा फुलून येतो
डिरी डिरीवर मोहरांची आरास लेवून येतो

देहावरी उन्हाचे जरी चटके मिरवित असतो
भग्न जुन्या फांद्यांना अन् स्वीकारत असतो

वृद्ध जुनाट मुळातून रस शोषून घेत असतो
जीवनाला पुन्हा एक आलिंगन देऊ पाहतो

आणि तरीही शेवटी फुलोरा तो गळून पडतो
फळाविना शेवटचा गंध त्याचा हरवून जातो

का न कळे नशिबी काही क्षणांचे सुख असते
मोहरून जन्म पुन्हा धुळीचेच का गाणे होते

म्हणून म्हणती शहाणे आशेच्या या घराला
नसे भिंतीं न छत न मिळे आधार कुणाला


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...