सोमवार, १३ मार्च, २०१७

खुळा बहाणा









खुळा बहाणा

खुळ्या जगण्याचा
खुळाच बहाणा
हरवल्या मना  
मार्ग नाही ||

रोज धडपड
तीच गडबड
जीवा लागे गोड
घोर ऐसा ||

दूर जावू जाता
अडविती वाटा
घुसलेला काटा
काळजात ||

जरी चित्त सारे
मुग्ध वादळात  
प्राणाचा शेवट
हवा वाटे ||

खोटे वाटे जग
ऐसी तगमग
अंतरात आग
पेटलेली ||

पेटवला चूड
जाळो देह मना
एवढी कामना
पूर्ण व्हावी ||

विक्रांत भिजून
उजाड वावर
फाटण्यास उर
सज्ज दत्ता ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने



रविवार, १२ मार्च, २०१७

तू अहिल्या !!




तू अहिल्या  !!

जग तसे छोटे आहे
दिशेमध्ये भरलेले
तू कोठे जाशील राणी
मन जरी वादळले

बंद कर दरवाजा   
कड्याकुड्या लाव जरा
जन्म गेला अंधारात
सवयीचा भाग सारा

बघ स्वप्न पाहू नको
मोहजळी पोहू नको
पोटासाठी गोतासाठी
सुरक्षाही सोडू नको

तसे काय कमी इथे
संसाराचे चाले गाडे
हरवता मन उगा
त्याला देई धडे थोडे

उडतील वर्ष बाकी
सरेल ही जिंदगानी
येवूनिया गेल्या किती
तयातील तू कहाणी

कुणी म्हणे तुला आहे
पंख काही मालकीचे
काहीतरी ऐकू नको
पदर ग ते शोभेचे

चंद्र मुळी तुझा नाही
तुझे नाही तारे वारे
येईल मालक घरी
तोच तुझा बाई सारे

आवड नावड तुझी
त्याला काय मोल आहे
म्हण नाथ स्वामी पती
व्यर्थ जरी बोल आहे

कुणीतरी भेटलेले  
प्राणप्रिय वाटलेले
भ्रम असतात असे
जागोजागी पडलेले

मरू देत वेडे मन
जळू देत व्यर्थ तन
अहिल्या होतेच अंती   
अशी वा तशी पाषाण

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, ११ मार्च, २०१७

रंग भगवा अबोलीचा



रंग भगवा अबोलीचा

अजून कुठे दुनिये तू जाणलेस मला
मी कसे मग जाणावयास जावे तुला

फिकीर माझी कधी नव्हतीच तुला
फिकीर का मग तुझी असावी मला 

मी जातो माझ्या तू तुझ्या वाटेला  
सुखदु:ख राहो माझे माझ्या उशाला  

अंधार प्राशून इथे मी जगलो जेधवा
प्रकाश का तुज होता कधी मागीतला   

जरा बहकलो या मी सुखाच्या सुगंधी
हवे का सांग तव शोधावया फुलाला

तसा तर निभावला मी उपचार सारा तुझा
आता कशाला हवा तुज आणखी हवाला

जन्म धुनीतील मी असे राख फासलेला
रंग भगवा अबोलीचा या हातात बहरला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in








शुक्रवार, १० मार्च, २०१७

जाते कधी म्हणू नको .



जाते कधी म्हणू नको .

अवघड आहे सखी
तुझ्याहून दुरावणे   
लाख देशील निरोप
घडेना ग सावरणे  ||

रीतभात कळे मज
कळे खुळी लोकलाज
अनावर भावनांची 
पण देही उठे गाज  ||

कधीतरी कर डोळी
अमृताची बरसात
कधीतरी खेळ होळी
प्रणयाच्या अंगणात ||

हरवले गीत माझे
पैजनांच्या पावुलात
शोधू कुठे मन वेडे
खुळावले कंकणात ||

जाते कधी म्हणू नको
प्रीत माझी विदारून
तुझ्याविना जगतांना  
जाईल ग मी मरून  ||

चार क्षण विसावले
सवे तुझ्या विसरले
हरू देत क्षोभ सारे
दु:ख लोट दाटलेले ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

गुरुवार, ९ मार्च, २०१७

बाळपणींच सर्वज्ञता, वरी तयातें ॥ ४५३ ॥ ज्ञा.६





बाळपणींच सर्वज्ञता, वरी तयातें ॥ ४५३ ॥ ज्ञा.६

देहाच्या आकारी
प्रकाश पाझरे
ज्ञानाचे उजिरे
जगतात ||

जसे का उजेड
सूर्याच्या आधी
येवून जगती
उभा ठाके ||

बालकपणीच
पुर्णत्वे भरून
दशा विसरून
आले ज्ञान  ||

हे तर चरित्र  
देवा हो आपुले
शब्दात ठेविले
आपणच ||

होवून आरसा
दाविला चेहरा
उपकार भला
जगी केला ||

घेवून शब्द हे
तुमचे उशाला
विक्रांत निजला
ध्यानशेजी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in




बुधवार, ८ मार्च, २०१७

दत्त याचना



जाहलो पतित
हरवून वाट
दिवसाच रात
चालतांना ||

डोळ्याला पडळ
दिसतच नाही
धावाधाव काही
कामा नये ||

देवून हाकारे
होय कंठशोष
दत्ता तुझा घोष
वाया गेला ||

सुखाची सावूली
मायेचाच भ्रम
मृगजळ प्रेम
जगताचे ||

मन हे मरेना
भावना हरेना
हातात पडेना
इहपर ||

बंधूनी हातास
वाढसी पक्वान्न
देसी पायाविन
स्वर्गमाडी  ||

अवघी कुचेष्टा
होय यातायात
सरे सारी बात
कृपाळाची ||

विक्रांत वाहतो
जीवनी गुमान
असे हिणवण
बरे नसे ||

द्यायचे तर देई
दत्ता कृपादान
करी सोडवण
किंवा माझी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in




  

मंगळवार, ७ मार्च, २०१७

राधिके



राधिके
हासतील तुला सारे 
ठेवतील नावे सारे 
भोवताली आग वारे 
तू नकोस मना घेवू

प्रीत केली राधिके तू 
नाकारुनी जगास तू 
शब्द अभद्र अतृप्त  
तू नकोस कानी ऐकू 

कृष्ण सखयाची प्रीती 
भाग्यवान आहे किती 
आले काय गेले हाती 
तू नकोस कधी पाहू 

दे धार्ष्ट तुझे श्यामला
बंड आवेग मनाला 
पदी ठेवी जीवनाला 

तू नकोस दूर जावू

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...