बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

काव्य रसिक मित्रांस



काव्य रसिक मित्रांस

बघा कळले तर
मी काय म्हणतो ते
पण कळण्याची सक्ती नाही
बघा चालली तर
गाडी जुनाट
बॅटरीत पुरेशी  शक्ती नाही

कुणाच्या हातात
असते काही जादू
नशीब कधीच रुसत नाही
माझे कशाला हो
विचारता काही
बटाट्याचे रूप बदलत नाही

कारण नसता
भेटलो आपण 
देणे घेणे असेल काही
आता घेणे का देणे
अवघड प्रश्न 
मी तरी सोडवत नाही

फुकट हवय का
घेवून जा सारे
कुणी सुद्धा अडवत नाही
आपले काय होते इथे
माल बापाचा
कधीच संपत नाही

कसले गुपित
अन कसली कोडी
कुणा स्वस्थ बसवत नाही
उधळल्या अश्याच
म्हणून कुणी रे
हिरे गारा ठरत नाही

घेणाऱ्यानी घेतले
जाणाऱ्यांनी टाकले
तरी वस्तु बदलत नाही 
किती तेल लावले तरी
विक्रांत टकलास
केस उगवत नाही

विक्रांत प्रभाकर तिकोणे





मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

हुतात्मा






काळ्या डोहात बुडाले स्वर्ग सुवर्ण डोहाळे
चिंचा आवळ्या सकट गेली हरवून बाळे
माय रडते बेभान जग भकास नजरी
किती जळणार इथे दीप कराळ अंधारी
झाल्या कवड्या डोळ्यांच्या ऋतू उलटून गेले
रान हिरवे का होते प्रश्न भयाण पडले
माती मनात ओली सय कुठल्या पाटाची
ओझे उद्याचेच डोई वाट पायाला गाळाची      
एक रुखरुख खोल पाने गळून पडली
कुण्या घरट्या आडोसा नच सावली उरली
किती फुटावे पहाड कोसळावे देवदार
बिंदी माथीची पुसली मेंदी फिकी हातावर 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 


सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

पेन पत्र शाई दत्त






कुणासाठी काही
लिहितो न भाई
पेन पत्र शाई
सारे दत्त ||१||
दत्त अंतरात
उतरे शब्दात
पाझरे पद्यात
अर्थ ध्वनी  ||२||
तयाचे भजन
तोच करविता 
स्मरणी ठेवता
कृपाळूवा ||३||
विक्रांता व्यसन
शब्दांचे म्हणून
हळूच घुसून
पदी आला ||४||
किती लावी जीव
घेतसे काळजी
म्हणूनिया लाजी
भक्ती करे||५ ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 

............................................................

रविवार, ११ डिसेंबर, २०१६

खेळ अस्तित्वाचा..




****************
माझे मलाच काचती वेष राजवर्खी शेले
प्राण व्याकूळ बंदी श्वास देही जड झाले

खेळ अस्तित्वाचा जुना किती जनांनी खेळला
चार भांड्यात कोरला स्वर्ग महाल थोरला

तऱ्हा तीच आडवाटी कुणी लिहून ठेवली
पायी टोचावेत काटे रीत आखून टाकली

किती मोजाव्या पौर्णिमा दीर्घ घामट उन्हाळे  
किती दाबावेत उरी वांझ मनाचे उमाळे

कुणी पेरुनिया गेले मनी कवडसे काही 
झाड सूर्याचे अजून पण उगवले नाही

खंत कधीच ठेवली उंच बांधून आढ्याला
आता आताच भाजला मासा खारट उरला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




शनिवार, १० डिसेंबर, २०१६

मायबाप दत्त भक्त








माझे मायबाप 
तुम्ही दत्त भक्त
राहती स्मरत 
दिगंबरा ||१||
तुमच्या पायीची 
लावी धूळ माथा
प्रिय दत्तनाथा 
तुम्ही सारे ||२||
तुमच्या साधने 
धीर काही येई
दत्त पथा होई 
चालणे ते ||३ ||
विक्रांता लाभावा 
अल्प आशीर्वाद
दत्ताचा प्रसाद 
तुम्हामुळे ||४ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...