सोमवार, १६ जून, २०१४

सुटती आधार





जीवन सदैव
मागते सुख
फाटका खिसा
पाकीटा भोक

चार चवल्या
खुळखुळ हाती
ऐकत ऐकत
जिंदगी जाती

सावळा चेहरा
लोभस खरा
तो ही तोडून
जातो अंतरा

सरती दिन
स्वप्ने अपार
अन अकाली
सुटती आधार

देहाचे ओझे
जन्माला होते
वेदना गाठोडे
शब्दात कण्हते

विश्वाचा स्वामी
असतो कुणी
गुरेच बांधली
तयाच्या दावणी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



रविवार, १५ जून, २०१४

मागणे न माझे






मागणे न माझे  
तुज देणे घेणे
मरे एक मुंगी  
इथे आणखी ही 

भीतीची सावली
उन्हात जळावी
अशी इथली ही
रीत मुळी नाही

दु:ख दाटलेले
मनी खोचलेले
कधी कुणी दिले
ही तक्रार नाही 

सुखांची उधारी
नवसांच्या दारी
कृती मज ऐसी
जमणार नाही 

तुझे बरे चालो
इथे नि तिथे ही
असू देत मला   
माझे जगणे ही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



शनिवार, १४ जून, २०१४

प्रभू आणि प्रिया





प्रभू शोधणारे मन
प्रियेसाठी वेडे होते
दऱ्याखोऱ्यातील वाट
पुनरपि जगी येते

कसे ध्यान करू आता
मनास ती व्यापलेली
जरा मिटताच डोळे
समोरीच बसलेली

नाही मंत्र नाही जप
तिचे नाव आपोआप
जगण्याला अर्थ देते
तेच सावळेसे रूप

शोधलेले सुख बहु
शेजारीच सापडते
नाभीमध्ये गंध मृग  
रानोमाळ धुंडाळते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...