सोमवार, २० जानेवारी, २०१४

वीणा निर्भया आता इस्टर


 

वीणा निर्भया आता इस्टर
कसे कधी हे चक्र थांबणार
नरा नरात लपलेला हा
पशु कधी दूर हटणार

प्रत्येक स्त्री मादी असते
मिळाली तर हवी असते
वखवखलेल्या हवेपणाला
पोर कुणाची का न दिसते

राणी हाती सत्ता यावी
मुंग्यांची मग सेना व्हावी
स्त्रीसत्ताकी त्या हुकुमातून
घडेल काही अथवा नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १९ जानेवारी, २०१४

भेट







आता तर गोष्ट आपुली
इथवर येवून आहे ठेपली
आलीस तू अन गेली
मी चौकशीही न केली

नाही तसे सारे काही
विसरलो मी अजुनी नाही
स्मृतीचेच पण सांगाडे ते
जीव त्यात आता नाही

डोळ्यामध्ये तुझ्या पाहिले
भाव पाटी स्वच्छ पुसले
नव्हती त्यात ओळख कुठली
नव्हतेच जणु घडले काही

मग तो शिक्का सरकारी
ठपकन कागदावरी मारुनी
नेक्स्ट कोरडे तुज म्हणुनी
दूर सारीले मी नजरेपासुनी   


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





शनिवार, १८ जानेवारी, २०१४

सोपानदेव समाधीपाशी





सासवडी येवून | घेता दर्शन |
झाले समाधान | अंतर्यामी ||१||
सवड काढून | धाव धावून |
गेलोसे भेटून | काही काळ ||२||
दुपारचे दोन | रणरणते ऊन |
शांतपणे म्हणून | घडली भेट ||३||
अंतरीचे तुज | सांगता गुज |
उरी गजबज | बहु जाहली ||४||
गहिवरले नेत्र |थरारली गात्र|
मारीता मात्र | मिठी समाधी ||५||
प्रेमात तल्लीन | लागले ध्यान |
भक्तीचे मागण | आले मनी ||६||
निघता माघारी | हुरहूर उरी |
पुन्हा लवकरी | बोलवा देवा ||७||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...