*****
चालण्याचा छंद नाही
तरी घडे चालणे.
वाहण्याचा धर्म नाही
तरी घडे वाहणे
कशाला हा देह असे
घडेना कळणे
तरी पण सांभाळणे
वेदनांचे देणे
मोक्षाची वाट वेड्या
पाहिली का कुणी
ज्याच्या त्याच्यासाठी
चाले त्याची गाणी
अगणित वृक्षांनी
वेढलेली अवनी
एकेक चित्र दिसे
एकेका पानी
जरी जीवा ठाव असे
कथेतील गाथा
डोळ्यातून काळजात
उतरते व्यथा
माई तरी सोस तुझा
सुटता सुटेना
काळजाची कळ माझी
मिटता मिटेना
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .