गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

प्रकाश देवता





प्रकाश देवता

***********

खेळ संपता संपता 
गाव अंधारी दाटता 
पाय वळत माघारी
जात घराकडे वाटा

माय उभीसी दारात 
दिवा तिच्या हातात 
मंद प्रकाशात दिसे 
तिचे रूप सोनीयात

शीण दिवसांचा सरे 
जाय लागले खुपले 
धाव घेई तिच्याकडे 
मन प्रेमी आसावले

येई कौतुक डोळ्यात 
रेषा काळजीची मिटे
काही बोलल्या वाचुनी 
लाख आशिषची भेटे

गोष्ट काल कालचीही 
वाटे घडावी आजही
काळ वैरी या जगाचा 
भाग्य थोरले ते नाही


आता नाही तो आकार
माझी प्रकाश देवता 
परी हृदयी तो दिसे 
दीप अजून तेवता 



© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

मजसाठी कधी धावतील

मजसाठी कधी धावतील सांग श्री गुरुदत्ता
मजलागी कधी पावशील सांग श्री गुरुदत्ता
अजान मूढ बालक मी लागलो तव चरणा
घे उचलुनी प्रेमाने तू रे तुझाच मी आहे ना
धडपड चाले जगी माझी एक तुला भेटण्या
जन्म जीवन जगण्याची या कारणे शोधण्या
पाप जळू दे पुण्य घडू दे होऊ दे रे तव करुणा
हाक मारून थकला विक्रांत धाव पतीत पावना
© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

कृष्णा काठ

कृष्णाकाठ
*********

ओली वाट ओली पहाट
ओला ओला कृष्णा काठ
ओला वृक्ष ओली पाने
ओल्या तळी देव गाणे
ओले हात ओली फुले
चिंब ओले गर्द डोळे
ओले ओठ शब्द ओले
व्याकुळले खुळे डोळे
ओले तन ओले मन
अासावले ओले स्वप्न
चिंब भिजला जन्म सजला
हवे काय या विक्रांतला
**
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

तुझे स्वप्न

तुझे स्वप्न
**********
तुझे स्वप्न हे
अर्धे अधूरे
तरी साजरे
आहे काही
.
डंख तुझा तो
मधू विखारी
तया निवारी
औषध  ना
.
प्रेमातून त्या
होता सुटका
घट फुटका
माझ्या हाती
.
लखलखते 
तप्त सुवर्ण
गेलो होऊन
जरी काही
.
मूर्त जाहलो
सुवर्ण राशित
परि बंदिस्त
कर्मगती
.
म्हणतो आता
ये सोडव रे
अवधूता रे
विक्रांत या
.

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

हे वृक्षांनो (आरे कॉलनीतल्याही)





हे वृक्षांनो (आरे कॉलनीतल्याही)

हे वृक्षांनो
माफ करा आम्हाला
वाढतेय आमची प्रजा
वाढताहेत गरजा
नाही थांबवता येत
कत्तल तुमची आम्हाला
सत्तेमधील समीकरणे
धनिकांचे घर भरणे
जणू काही हे सारे
मान्य आहे आम्हाला

पर्याय असतात सापडतात
जर शोधले तर
युरेका नावाचा हर्षवायू
कधी लागतो हाताला

पण धनदांडगे कॉन्ट्रॅक्टर
टक्क्यांवर पोसली जाणारी
त्यांची बुभुक्षित पिलावळ
हसते ठेंगा दाखवून आम्हाला

मरा तुम्ही ठिकऱ्या पडत
पडा तुम्ही फांद्या तुटत
तुमचे ते हिरवे जग
जल्लाद म्हणू देत आम्हाला

त्या तुमच्या मरणात आम्ही
अधोरेखित केले आमचे मरण
शेवटी चिता आणि शवपेट्या ही
तुम्हीच होताना आम्हाला
*

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

रिकामे आसन


रिकामे आसन

***********



रिकामे आसन

श्री गुरुदेवांचे

धैर्य पाहण्याच

मज नाही ‍‍‍‍..


सरले भेटणे

पाहणे बोलणे

सुखात नहाने

शब्दात त्या 


झाली सुखमूर्त

पंचत्वी विलीन

जनाची सरुन

नातीगोती 


होय विश्वाकार

देहाचा आकार

आशिष अपार

जगासाठी 


परी डोळीयात

आसवांच्या सरी

उरीच्या काहूरी

अंत नाही 


होतो तुझा भास

भक्त भजनात

निनादे कानात

स्वर तुझा 


रेखाटली मूर्त

उंच तसबिरी

परि तव सरी

त्यात नाही 


आता आताच मी

धरियेला हात

आता पावलात

बळ आले 


कोण सांभाळेल

कळेना मजला

अजून डोळ्याला

दृष्टी नाही 


परते वाटाड्या

वाट ही समोर

जायचे त्यावर

आहे आता 


अशी पाहुनिया

शिष्याची भावना

धन्य धन्य मना

शब्द आले 


विक्रांत निष्ठा ही

दत्ताला मागतो

वाटेने चालतो

परमार्थी 



© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

महापुर



























महापुर
******
येतो महापुर
माझिया शब्दांना
तुज स्मरतांना
गुरुदत्ता॥
वाकड्या उसात
अमृताचा झरा
शब्द तैसा खरा
मनातला ॥
मोकळी मराठी
माळरानातली
तव पायतळी
फुले होती ॥
विणतो अक्षर
अभंग ओवीत
मनातील प्रित
रेखाटीत ॥
किती खरी खोटी
तुज एक ठाव
सर्वज्ञांचा राव
तुच प्रभू ॥
विक्रांत संतांच्या
चाले वाटेवरी
शब्दांची चाकोरी
धरोनिया॥
**

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...