शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

नको ते



नको तेच काज
*****:*****

नको तेच काज 
देऊनिया दत्त 
बसला हसत 
दूरवरी ॥

भरतेय पोट 
चालतेय घर 
वाहतो संसार 
पाठीवर ॥

करतो गुलामी 
जनाची मनाची 
करणी जन्माची 
हीच झाली ॥

आणिक नोकरी 
एक ती लाचारी 
घातलेच भरी 
वाहण्याला ॥

तुझा असा खेळ 
कळेना मजला 
आलाय कंटाळा 
बहु परी ॥

विक्रांत ढकले
जीवनाची गाडी 
जाय गडगडी 
उतारास ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

वृक्ष

 वृक्ष
*******

जेव्हा पडे बीज 
उत्तम मातीत 
सहज रुजत 
फळा येते ॥१

सफळ होताच 
पुण्यकर्म सारी  
बघ मुक्ती चारी 
घरी येती ॥२

तरारून येते 
श्रध्येचे अंकुर 
अनुभूती पूर 
ये दाटून ॥३

अैसे  काही होते 
कुण्या जीवनात 
भाग्याचा वसंत 
डोकावतो॥४

लगडते झाड 
पिकल्या फळांनी 
सुखाने भरूनी 
जग जाते ॥५

आत्मतृप्त होता 
सुख ते वाटता 
विश्रांती न घेता  
सुखी होतो ॥६

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

नर्मदामाई अन धरणे


नर्मदामाई अन धरणे 
***************

बुडाली शहरे .
देवळे बुडाली 
प्रगती ही झाली .
थोर इथे॥

हरवली घरे 
आणिक शिवारे  
जीव तया झुरे 
आठवून ॥

माय तुझा पथ 
त्यात हरवला 
दृष्टिदूर झाला
किनाराही ॥

शुलपाणी देव 
निसर्ग सुंदर
पाणी तयावर 
ओढवले ॥

माय तुझी मर्जी 
आम्हाला कळेना .
परी साहवेना .
व्यापार हा ॥

विक्रांत चालतो. 
चालल्या वाचून।
परिक्रमेतून 
लाखो पायी.॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

पदावर

दत्त पायावरी
*********
दत्ता पायावरी 
मज घ्या एकदा 
जन्मही आपदा 
सरू द्या हो ॥

दत्ता संसारात 
नको वाटे आता 
व्हावा मी चालता 
तुझ्या पथी ॥

दत्ता कशाला रे 
पाठवले इथे 
मज न कळते
काही केल्या॥

पण एक बरे 
बसतात ठेचा 
तेणे येते वाचा 
नाव तुझे ॥

विक्रांत जगात 
जगतो उदास 
धरुनिया आस 
दत्ता तुझी॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

साद


साद
*****

तुझ्या डोळीचे चांदणे 
साद घालती कुणाला 
ओठ व्याकूळ अधीर
याद करती कुणाला

स्वप्न तेच जरी जुने 
नवी फुटली पालवी 
ताप साहून उन्हात 
मनी उभारी हिरवी 

बटा पिंगट मोकळ्या 
सोन झळाळी मिरवे 
फुलपाखरू अल्लद 
तिथे कुणीतरी यावे

काय कानी तुझ्या पडे 
बोल गुज अलगुज 
जग द्वाड चहाटळ 
नको ऐकू कुजबुज

तुझा यमुनेच्या तीर
चिंब अमृत पुनव 
मनी घालतो ना रुंजी 
मंद बासरीचा रव   ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


रविवार, १२ डिसेंबर, २०२१

नसे खेळ

नसे खेळ
********
अरे नसे खेळ 
दत्ता तुझी भक्ती 
पेलावया शक्ती 
लागे फार ॥१
हरलेत किती 
रथी-महारथी 
जिंकू जे म्हणती 
तुज लागी॥२
ध्यानी धुरंधर 
दानी ते उदार 
ज्ञानाचे भांडार 
जगात या ॥३
कोण पारायण 
करी जन्मभर 
तपी ते अपार 
कोण श्रमी ॥४
कोणी नामावळी 
केल्या कोटी कोटी 
कुणी ते भ्रमती 
तीर्थ लक्ष ॥५
जरी उचलून 
घेशील तू दत्ता 
तरीच विक्रांता 
आशा काही ॥६

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

प्रार्थना

प्रार्थना
******
होऊन व्याकुळ 
करतो प्रार्थना
 मज दयाघना 
साहय करी ॥

नाही मी मागत 
ऐश्वर्य जगाचे 
झेंडे कीर्तीचे 
तुजलागी ॥

नको ते नेतृत्व 
नको ते दातृत्व 
आणिक भोक्तृत्व 
कशाचेही ॥

नितळ निर्मळ 
देई तुझी भक्ती 
अपेक्षांची वृत्ती 
नसलेली ॥

जसे बाळावर 
आईची ती प्रीती  
तैसा मजप्रति 
होई दत्ता ॥

विक्रांत गांजला 
जगी भटकला 
शरण हा आला 
अवधूता.॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...